
रत्नागिरी, 20 ऑगस्ट (हिं.स.) । राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार रत्नागिरीत योग आणि वेलनेसविषयक अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया रत्नागिरीत संस्कृत विश्वविद्यालयाच्या उपकेंद्रत सुरू झाली आहे.
आधुनिक जीवनशैलीतील वाढता ताण, बदलती जीवनशैली, आरोग्याविषयी वाढती जागरूकता आणि मानसिक स्वास्थ्याला मिळणारे महत्त्व यामुळे योग, वेलनेस, फिटनेस आणि समग्र आरोग्य या क्षेत्रांना मोठी मागणी निर्माण झाली आहे. योग हा केवळ व्यायाम किंवा आसनांचा विषय न राहता आरोग्य, शिक्षण, कॉर्पोरेट वेलनेस, फिटनेस आणि जीवनशैली व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे शास्त्रीय ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्य असलेल्या योगतज्ज्ञांसाठी देश-विदेशात विविध संधी निर्माण होत आहेत.
या पार्श्वभूमीवर कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्रात NEP-2020 आधारित बी.ए. योगशास्त्र पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार असून योगाची आवड असणाऱ्या तसेच योगशास्त्राचा शास्त्रीय अभ्यास करून करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे.
बी.ए. योगशास्त्र अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना योगासनांसोबत योगदर्शन, योग मानसशास्त्र, प्राणायाम, ध्यान, योगाचे शास्त्रीय स्वरूप, मानवी शरीररचना व शरीरक्रियाशास्त्र तसेच योगाचे आरोग्यविषयक उपयोग यांचा अभ्यास करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना योगाकडे केवळ प्रात्यक्षिक विषय म्हणून नव्हे, तर शास्त्रीय, तात्त्विक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळणार आहे.
NEP-2020 च्या बहुविषयक आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या दृष्टिकोनानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येतो. योगशास्त्रासोबत इंग्रजी संवादकौशल्य, भारतीय ज्ञानपरंपरा, संस्कृत, इतिहास, पर्यावरण शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद आणि सादरीकरण कौशल्य यांसारख्या विषयांचा अभ्यास विद्यार्थ्यांना व्यापक ज्ञान आणि कौशल्ये विकसित करण्यास मदत करणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्य, आत्मविश्वास, संवादक्षमता आणि रोजगारक्षमता विकसित होण्यास मदत होईल.
भारतीय योगपरंपरेला जागतिक स्तरावर मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. भारताबरोबरच परदेशातील योग केंद्रे, वेलनेस सेंटर, रिसॉर्ट्स, फिटनेस सेंटर, शैक्षणिक संस्था आणि कॉर्पोरेट वेलनेस कार्यक्रमांमध्ये योग व वेलनेसशी संबंधित विविध भूमिका निर्माण होत आहेत. योगशास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतर संबंधित अतिरिक्त पात्रता व कौशल्यांनुसार विद्यार्थी योग शिक्षक, योग प्रशिक्षक, वेलनेस ट्रेनर, योग व फिटनेस ट्रेनर तसेच कॉर्पोरेट वेलनेस क्षेत्रात करिअरच्या संधी शोधू शकतात.
योग आणि वेलनेस क्षेत्राचा विस्तार होत असल्याने विविध आरोग्य व वेलनेस उपक्रम, शैक्षणिक संस्था, योग प्रशिक्षण केंद्रे, फिटनेस सेंटर, कॉर्पोरेट वेलनेस कार्यक्रम, रिसॉर्ट्स, हॉस्पिटल वेलनेस कार्यक्रम आणि AYUSH संबंधित उपक्रमांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता वाढत आहे. तसेच योगशास्त्रातील पदवी ही पुढील उच्च शिक्षणासाठीही भक्कम पाया ठरू शकते. विद्यार्थी पुढे एम.ए. योगशास्त्र, NET/SET, संशोधन आणि Ph.D. यांसारख्या शैक्षणिक संधींचाही विचार करू शकतात.
नोकरी, व्यवसाय, इतर अभ्यासक्रम किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी सायंकाळी वर्गांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नियमित शिक्षणासोबत योगशास्त्राची पदवी प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम विशेष सोयीचा ठरणार आहे.
बी.ए. योगशास्त्र अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांचा असून प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. योगाचे शास्त्रीय व प्रात्यक्षिक शिक्षण, भारतीय ज्ञानपरंपरा, आधुनिक कौशल्ये, संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि करिअरच्या विविध संधी यांचा समन्वय असलेला हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, शिक्षण, वेलनेस आणि रोजगाराच्या क्षेत्रात पुढे जाण्याचा मार्ग ठरू शकतो.
“योगशास्त्राची पदवी — आरोग्य, कौशल्य, संस्कार आणि उज्ज्वल करिअरचा भक्कम पाया!” या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी योगाकडे केवळ व्यायाम म्हणून न पाहता ज्ञान, आरोग्य आणि करिअरची नवी दिशा म्हणून पाहावे, असे आवाहन रत्नागिरी उपकेंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी प्रा. कानिफनाथ पंढरे (९५२७१६४९००) किंवा प्रा. अविनाश चव्हाण (८३९०८५४९२६) यांच्याशी संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी