
अमरावती, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
वेतन वेळेवर मिळत नसल्यासह ईपीएफची रक्कम जमा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंत्राटदारांच्या विरोधात १०२ रुग्णवाहिका चालकांनी पुकारलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी चालकांच्या विविध मागण्या मान्य करीत कंत्राटदारांकडून ईपीएफ व वेतनाची वेळेत पूर्तता न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची हमी दिली. त्यामुळे आंदोलनकर्त्या चालकांना दिलासा मिळाला. जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका सेवा सुरळीत ठेवण्यात चालकांची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र मागील काही काळापासून वेतन वेळेवर न मिळणे, ईपीएफची रक्कम नियमितपणे जमा न होणे यांसह विविध समस्यांना चालकांना सामोरे जावे लागत होते. वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी न लागल्याने चालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी रुग्णवाहिका चालकांच्या आंदोलनाला भेट देत प्रतिनिधींसोबत चर्चा केली. यावेळी चालकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. कंत्राटदारांनी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर अदा करणे तसेच ईपीएफची रक्कम नियमानुसार जमा करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. वेतन अथवा ईपीएफबाबत पुन्हा टाळाटाळ झाल्यास संबंधित कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट हमी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. प्रशासनाच्या या आश्वासनानंतर चालकांनी आंदोलन मागे घेतले. आता दिलेल्या आश्वासनांची प्रभावी अंमलबजावणी होते का, याकडे चालकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी