
डोंबिवली , 20 ऑगस्ट (हिं.स.)महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी विद्यार्थी सेनेच्या सुरू असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शहरातील विविध महाविद्यालयांना भेटी देत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) युनिटचे उद्घाटन केले. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विद्यार्थीहिताच्या विविध विषयांवर चर्चा केली.
अमित ठाकरे यांनी डोंबिवलीतील प्रगती कॉलेज आणि पेंढरकर कॉलेजला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तसेच त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या दौऱ्यावेळी मनसे नेते राजू पाटील, मनविसेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव, शहराध्यक्ष हर्षद पाटील, प्रतीक देशपांडे यांच्यासह मनसे व मनविसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान पत्रकारांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारला असता अमित ठाकरे यांनी डोंबिवलीतील रस्त्यांच्या स्थितीवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. रस्त्याचा एक भाग सिमेंटचा, एक भाग डांबराचा आणि एका भागावर पेव्हर ब्लॉक त्यामुळे असा कोणता रस्ता असतो? असा रस्ता कसा बनवू शकतात? असा उलट प्रश्न केला.
रस्त्यांच्या समस्येवर केवळ तरुणांनीच नव्हे, तर सर्व नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले..हे फक्त झेन अल्फा किंवा झेन झीपुरते मर्यादित ठेवू नका. या खड्ड्यांचा त्रास तुम्हा सगळ्यांनाच होतो. उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र इथले खासदार आहेत ना? इथले खासदार, आमदार कोण आहेत, त्यांना हे प्रश्न विचारा असे अमित ठाकरे म्हणाले.
या दौऱ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादात युवकांच्या अपेक्षा, विद्यार्थीहिताचे प्रश्न आणि विविध सामाजिक विषयांवरही चर्चा करण्यात आली. तसेच सदस्य नोंदणी अभियानाच्या अनुषंगाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संघटनेशी जोडण्यावर मनविसेकडून भर दिला जात आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi