
नागरिकांच्या समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांना तातडीच्या कार्यवाहीच्या सूचना
छत्रपती संभाजीनगर, 20 ऑगस्ट (हिं.स.) : गावागावांतील विकासकामांचा आढावा घेणे, विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, याची माहिती घेणे तसेच नागरिकांच्या समस्या थेट त्यांच्या दारी जाऊन जाणून घेण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या “ग्रामविकासाची वारी, सभापती जनतेच्या दारी” या उपक्रमांतर्गत पंचायत समिती सभापती सौ. अनिता सुरेश बनकर यांनी केळगाव येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी सभापती बनकर यांनी गावातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या विविध अडचणी, शासकीय योजनांबाबत येणाऱ्या समस्या तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या कामांची माहिती घेतली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल, सिंचन विहिरी, शेतीविषयक योजना, पाणीपुरवठा, रस्ते आणि अन्य मूलभूत सुविधांसह ग्रामविकासाच्या विविध योजनांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे का आणि योजनांच्या अंमलबजावणीत कोणत्या अडचणी येत आहेत, याची माहिती घेऊन प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
“शासकीय योजना केवळ कागदावर न राहता त्यांचा प्रत्यक्ष लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे,” या उद्देशाने पंचायत समितीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, असे सभापती सौ. अनिता बनकर यांनी सांगितले. नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
गावांचा सर्वांगीण विकास, नागरिकांना शासकीय योजनांचा सुलभ व पारदर्शक लाभ मिळवून देणे आणि प्रत्येक गावातील मूलभूत समस्या प्राधान्याने सोडविणे हे पंचायत समितीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या उपक्रमामुळे नागरिकांना आपल्या समस्या व मागण्या थेट पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळत असून, विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही मिळत आहे. त्यामुळे “ग्रामविकासाची वारी, सभापती जनतेच्या दारी” हा उपक्रम ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे सांगण्यात आले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis