
- पुण्यात वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची उपस्थिती
बीड, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
बीड जिल्ह्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्न आणि प्रवाशांच्या विविध मागण्यांसंदर्भात मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत खा.बजरंग सोनवणे यांनी पुण्यात विशेष आढावा बैठक घेतली. बीड जिल्ह्याची रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासह प्रवाशांच्या सोयीसाठी विविध महत्त्वपूर्ण मागण्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत मुख्यत्वे बीड-हडपसर (पुणे) आणि मुंबई-बीड दरम्यान स्वतंत्र दैनिक एक्स्प्रेस रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत खा.बजरंग सोनवणे यांनी चर्चा केली.
अहमदनगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पांतर्गत बीड, आष्टी आणि नारायणडोह येथे माल गोदामे उभारण्याबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा झाली. तसेच मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे प्रकल्पाला गती देण्याबाबत खा.सोनवणे यांनी रेल्वे प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या. याशिवाय परळी-मुंबई दरम्यान नियमित दैनिक रेल्वे सेवा सुरू करणे किंवा विद्यमान सेवा विस्तारणे, प्रवाशांच्या सोयीसाठी विविध रेल्वेगाड्यांच्या वेळा पूर्ववत करणे आणि घाटनांदूर रेल्वे स्थानकावरील रेल्वेगाड्यांचे थांबे पूर्ववत अथवा नव्याने सुरू करण्याची मागणी त्यांनी मांडली. याचसोबत चंद्रपूर-कोल्हापूर आणि धाराशिव-दिल्ली एक्स्प्रेस सुरू करण्याबाबतही रेल्वे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. बीड जिल्ह्याच्या रेल्वे विकासाला गती मिळावी आणि नागरिकांना पुणे, मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांशी अधिक चांगली रेल्वे जोडणी मिळावी, यासाठी या सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी केली. बीडच्या रेल्वे विकासासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या उच्चस्तरीय बैठकीस मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव, प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक प्रभात कुमार, प्रधान मुख्य अभियंता राजनीश माथुर, प्रधान मुख्य विद्युत अभियंता अनूप कुमार अग्रवाल, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता सुबोध कुमार सागर, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त विवेक सागर, प्रधान मुख्य सिग्नल व दूरसंचार अभियंता मंदर उप्पल, पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुजीत मिश्रा, प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी आदित्य कुमार, मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) भुवनेश कुमार गुप्ता, प्रधान वित्तीय सल्लागार नमिता त्रिपाठी, मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक डॉ.मिलिंद हिरवे, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्निल नीला आणि के.के.मिश्रा यांच्यासह रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis