
बीड, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भेसळयुक्त पावडरची चोरटी वाहतूक आष्टी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत बोलेरो पिकअपसह एकूण ७२ गोण्या भेसळयुक्त पावडर जप्त करून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आष्टी-जामगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉन्ससमोर संशयित महिंद्रा बोलेरो पिकअप अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये दुधात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी व्हे पावडरच्या ४७ गोण्या आढळून आल्या. वाहनातील चालकाकडे अधिक चौकशी केली असता, त्याने यापूर्वी २५ गोण्या आष्टी येथील हर्षद हॉटेलसमोरील एका पत्र्याच्या शेडमध्ये उतरवल्याची माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही ठिकाणांहून विनापरवाना व मानवी आरोग्यास अपायकारक असलेली एकूण २ लाख ६९ हजार ७०० रुपये किमतीची पावडर आणि वाहन पंचांसमक्ष जप्त केले.
या प्रकरणी वाहनचालक सुशांत उर्फ बाबु लक्ष्मण गोपाळघरे (वय २० वर्ष, रा. नागोबाचीवाडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर), मालाचे मालक हारीदास एकनाथ गोपाळघरे (रा. नागोबाचीवाडी, ता. जामखेड) आणि माल स्वीकारणारा कैलास हंबर्डे (रा. आष्टी) यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी अजय भगवान गाढे (वय २७ वर्ष, रा. बीड) यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक वाघमोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद भुतेकर करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis