
नाशिक, २२ ऑगस्ट (हिं.स.) : खोटी आई आणि मामा बनून एका मुलीचा विवाह लावून देण्याचा प्रयत्न करत तिच्या आईची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहाच्या मोबदल्यात कदम कुटुंबीयांकडून दोन लाख रुपये घेतल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी माधव कारभारी वाघ, अंजना राजेंद्र देवरे, राहुल गबा शेळके (सर्व रा. नाशिक) आणि शिला मनोहर बनकर (रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी संबंधित मुलीच्या आईला २५ ते ३० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर मानेगाव, ता. सांगोला येथील दादा जयवंत कदम व इतरांकडून दोन लाख रुपये घेऊन मुलीचा अमोल दादा कदम याच्याशी विवाह लावून देण्याच्या उद्देशाने तिला खोटी माहिती सांगण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, मानेगाव येथील दादा जयवंत कदम, अमोल दादा कदम आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर व्यक्तींना पीडिता ओळखत नव्हती. तरीही आरोपींनी तिचा विवाह लावून देण्याचा प्रयत्न केला. मुख्य आरोपी माधव वाघ याने खोटे लग्न लावून देण्याच्या उद्देशाने पीडितेला खोटे बोलण्यास तसेच खोटे नाव सांगण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात अंजना राजेंद्र देवरे हिने पीडितेची खोटी आई, तर राहुल गबा शेळके याने खोटा मामा बनून तिच्या आईची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. ठरल्याप्रमाणे पीडितेच्या आईला २५ ते ३० हजार रुपये न देता फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच शिला मनोहर बनकर हिने पीडितेला माधव वाघ याच्यासोबत जाण्यास भाग पाडल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार १२ ऑगस्ट रोजी दसक शिवारात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI