लातूरमध्ये चोरीची दुचाकी बनावट क्रमांकाने तीन वर्षे वापरली; तरुण ताब्यात
लातूर, 22 ऑगस्ट (हिं.स.)। तीन वर्षांपासून चोरीची मोटारसायकल बनावट क्रमांक टाकून वापरणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीची हिरो होंडा मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, ही मोटारसायकल शिवाजीनगर पोलिस ठा
पोलीस कारवाई


लातूर, 22 ऑगस्ट (हिं.स.)। तीन वर्षांपासून चोरीची मोटारसायकल बनावट क्रमांक टाकून वापरणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीची हिरो होंडा मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, ही मोटारसायकल शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या २०२१ सालच्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक २२ ऑगस्ट रोजी सकाळी आरोपींचा शोध घेत असताना बसस्थानक परिसरात गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. जुना रेणापूर नाका परिसरात एक व्यक्ती चोरीची मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने थांबला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने वाहतूक नियमनासाठी कर्तव्यावर असलेले सहायक फौजदार बाळासाहेब गिते यांना सोबत घेतले. जुना रेणापूर नाका येथील मनपा सुलभ शौचालयासमोर दुपारी १२.०५ वाजता सापळा रचण्यात आला. यावेळी मोटारसायकलसह मिळून आलेल्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रमोद उर्फ काका प्रभाकर शिंदे (वय २६, रा. गांजूर, ता. चाकूर, जि. लातूर) असे सांगितले.

चौकशीत त्याने मोटारसायकलवर चुकीचा क्रमांक टाकून मागील सुमारे तीन वर्षांपासून ती स्वतःच्या गावात वापरत असल्याची कबुली दिली. गुन्हे अभिलेख तपासल्यानंतर ही मोटारसायकल शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील गु.र.नं. ४५८/२०२१, कलम ३७९ भादंवि अंतर्गत दाखल चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आरोपीकडून हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल जप्त केली. तिच्या क्रमांकाच्या पाटीवर चुकीचा क्रमांक टाकण्यात आल्याचेही आढळून आले. आरोपी प्रमोद उर्फ काका प्रभाकर शिंदे याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande