
छत्रपती संभाजीनगर, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
घरच्या घरी ६५ एकर शेती असतानाही महिलांना लुटून पैसे कमावणाऱ्या सराईत आरोपीला हर्सूल पोलिसांनी बेड्या ठोकल्या. एकट्या राहणाऱ्या व वृद्ध महिलांना हेरायचा. कर्ज मिळवून देतो, मुलाला नोकरी लावतो, अशी आमिषे दाखवत आधी त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर निर्जनस्थळी नेऊन धमकावत दागिने लुटायचा.
सिडकोतील एका महिलेला दोन लाखांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिला तिसगाव शिवारात नेले. तेथे धमकावत तिचे साडेपाच तोळ्यांहून अधिक सोन्याचे दागिने लुटले. दुसऱ्या महिलेला नोकरीचे आमिष दाखवून अयोध्यानगर-कर्णपुरा परिसरात नेऊन चाकूच्या धाकावर अंगठी लुटली. पोलिसांनी त्याच्याकडून दोन गुन्ह्यांतील पाच तोळे सोने व दुचाकी असा ८ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर हिंगोली व बाळापूरमध्ये सात गुन्हे दाखल आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis