
रायगड, 20 ऑगस्ट (हिं.स.)। उरण तालुक्यात जेएनपीए परिसरातील एका कंटेनर फ्रेट स्टेशनवर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई केली. मक्याच्या गोण्यांमध्ये लपवून परदेशात पाठविण्यात येत असलेले तब्बल ५५ किलो मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे ३०० कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय तस्करीच्या रॅकेटचा तपास सुरू आहे.
डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर जेएनपीए परिसरातील संशयित कंटेनरची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी कंटेनरमध्ये असलेल्या मक्याच्या गोण्यांमध्ये संशयास्पद पद्धतीने अमली पदार्थ लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. प्राथमिक चाचणीत जप्त करण्यात आलेला पदार्थ उच्च दर्जाचे मेथॅम्फेटामाइन असल्याचे स्पष्ट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्राथमिक तपासात या तस्करीचा संबंध पाकिस्तानस्थित अमली पदार्थ तस्कर मोहम्मद हुसेन याच्या सिंडिकेटशी असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. हे सिंडिकेट मालवाहू कंटेनरच्या माध्यमातून विविध देशांमध्ये अमली पदार्थ पाठविण्यासाठी सक्रिय असल्याचा संशय आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सिंडिकेटच्या सदस्यांनी मुंबईतील काही आयात-निर्यातदार कंपन्यांशी संपर्क साधून उत्तर प्रदेशातील एका व्यापारी संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मका परदेशात निर्यात करण्याचे नियोजन केले होते. त्यापैकी सुमारे १७.५ टन मका पॅक करून जेएनपीए येथील सीएफएसमध्ये आणण्यात आला होता.
डीआरआयने तातडीने कारवाई करत ५५ किलो अमली पदार्थ जप्त केला. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, अमली पदार्थाचा स्रोत कोणता, तस्करीमागील सूत्रधार कोण आणि अंतिम गंतव्य कोणते होते, याचा तपास सुरू आहे. जेएनपीएसारख्या महत्त्वाच्या बंदरातून कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ परदेशात पाठविण्याचा प्रयत्न उघडकीस आल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)