अमरावती - महर्षी पब्लिक स्कूलच्या मेसला एफडीएने ठोकले कुलूप; अन्नाचे नमुने तपासणीसाठी रवाना
अमरावती, 20 ऑगस्ट (हिं.स.)। अन्नातून विषबाधा होऊन एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणानंतर वादग्रस्त महर्षी पब्लिक स्कूलच्या मेसवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली आहे. एफडीएच्या पथकाने मेसची पाहणी करून तात्काळ मेस बंद करण्याचे आद
महर्षी पब्लिक स्कूलच्या मेसला एफडीए ने ठोकले कुलूप; अन्नाचे नमुने तपासणीसाठी रवाना


अमरावती, 20 ऑगस्ट (हिं.स.)।

अन्नातून विषबाधा होऊन एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणानंतर वादग्रस्त महर्षी पब्लिक स्कूलच्या मेसवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली आहे. एफडीएच्या पथकाने मेसची पाहणी करून तात्काळ मेस बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शाळा प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली आहे.१५ ऑगस्ट रोजी महर्षी पब्लिक स्कूलमधील अनेक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने मेस ची तपासणी केली. या तपासणीत स्वयंपाकघरात अस्वच्छता तसेच अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत अनेक त्रुटी आढळून आल्या.एफडीएच्या पथकाने मेसमध्ये वापरण्यात येणारे खाद्यतेल, गहू आणि तांदळाचे नमुने ताब्यात घेतले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या अहवालानंतर अन्न विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर बाब समोर आल्यानंतर प्रशासनाने मेस बंद करण्याची कारवाई केली आहे. या प्रकरणात शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.अधिकाऱ्यांच्या पथकाने येथे भेट दिल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक, परिचारिका आणि विद्यार्थी यांचे सविस्तर बयाण नोंदविण्यात आले आहे. परिचारिकेच्या मते चिखलदरा तालुक्यातील ज्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तो कधीच अंतर्गत तपासणीकरिता आपल्याकडे आलेला नाही, असे बयाणात म्हटले आहे.

गॅस सीलिंडरऐवजी लाकडांचा वापर

आदिवासी विकास विभागाकडून नामांकित आश्रमशाळेत उपलब्ध सुविधेनुसार प्रत्येक विद्यार्थ्यामागे ५० ते ७० हजार रुपयांपर्यंत खर्च केल्या जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा असणे गरजेचे आहे. येथील स्वयंपाकघरात गॅस सीलिंडरचा वापर करणे गरजेचे होते. त्याऐवजी लाकडांचा वापर केल्या जात असल्याने मोठ्या प्रमाणात धूर साचतो, असे निदर्शनात आले आहे.

२०२३ मध्ये झाली होती मान्यता रद्द

येथील असुविधेमुळे महर्षी पब्लिक स्कूलमध्ये नामांकित आश्रमशाळेची मान्यता २०२३ मध्ये रद्द करण्यात आली होती. संस्थाचालकांनी न्यायालयामध्ये धाव घेतल्यानंतर पुन्हा हा प्रकल्प येथे सुरू झाला होता, असेही अपर आयुक्तांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande