
छत्रपती संभाजीनगर, 20 ऑगस्ट (हिं.स.)। धाराशिव जिल्ह्यात ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या सहकार्याने प्रत्येकी पाच एकर जागेवर पाच नवीन देवराया विकसित करण्यात येणार असून, या उपक्रमासाठी पाच नामांकित कंपन्यांच्या सीएसआर निधीतून आर्थिक सहभाग घेण्यात येणार आहे. या संदर्भात धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
यावेळी ‘सह्याद्री देवराई’ संस्थेचे अध्यक्ष तथा अभिनेते सयाजी शिंदे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच टाटा मोटर्स, रिलायन्स फाउंडेशन, अशोक लेलँड, इंडियन ऑईल आणि टोयोटा या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रत्येक देवराईमध्ये सुमारे २ हजार ५०० देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, त्यांचे पाच वर्षे संगोपन केले जाणार आहे. एका देवराईच्या संवर्धनासाठी दरवर्षी सुमारे ५० लाख रुपये, म्हणजेच पाच वर्षांसाठी अंदाजे अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी आवश्यक जागा निश्चित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि वन विभागाला दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis