
लातूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
: लातूर शहरापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर लातूर-लामजना राज्य महामार्गालगत असलेल्या कातपूर-कव्हा साठवण तलावाच्या परिसराचा पर्यटन व नागरिकांच्या मनोरंजनाच्या दृष्टीने विकास करण्याच्या प्रस्तावाला आता गती मिळण्याची शक्यता आहे. तलावालगतची जागा शासनाने संपादित करून पाथवे, गार्डन, बोटिंग तसेच पाणीशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने माजी आ. तथा कव्हा गावचे भूमिपुत्र शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक टेकाळे व उपअभियंता राजेंद्र बिराजदार यांच्यासमवेत कव्हा साठवण तलाव परिसराची पाहणी केली. यावेळी प्रस्तावित पाथवे, सुशोभीकरणासाठी उपलब्ध जागा तसेच भविष्यातील विविध विकासकामांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
कातपूर-कव्हा साठवण तलाव लातूर शहराच्या अगदी जवळ असल्याने या परिसराचा नियोजनबद्ध विकास केल्यास लातूर शहरासह पंचक्रोशीतील नागरिकांसाठी एक आकर्षक पर्यटन व विरंगुळ्याचे ठिकाण विकसित होऊ शकते. तलावालगत प्रशस्त पाथवे, हिरवाईने नटलेले गार्डन, बोटिंगची सुविधा आणि पाणीशुद्धीकरण प्रकल्प उभारल्यास या परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.
या विकासकामांसंदर्भात माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड यांच्या माध्यमातून जलसंपदा विभागाकडेही याबाबतचे पत्र पाठविण्यात आले असून, सदर प्रस्तावाशी संबंधित पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाहीला गती मिळणार आहे.
यावेळी कव्हा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन सुदाम रुकमे, कव्हा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नेताजी मस्के, ग्रामपंचायत सदस्य नामदेव मोमले, गोपाळ सारगे, लक्ष्मण सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
कव्हाकडे केवळ पर्यटनाच्या दृष्टीनेच नव्हे, तर लातूर शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन या परिसराचा विकास करण्याची मोठी संधी आहे. पाथवे, गार्डन, बोटिंग आणि पाणीशुद्धीकरण प्रकल्पासाठी आवश्यक कार्यवाहीला गती देण्यात येईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक टेकाळे यांनी यावेळी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis