
नांदेड, २० ऑगस्ट (हिं.स.) : लोहा तालुक्यातील खडक मांजरी येथील नरवाडे परिवाराने जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. वडिलोपार्जित घरात शिक्षणाची मोठी परंपरा नसतानाही कुटुंबातील चार जण डॉक्टर झाले असून, त्यांच्या या यशाची परिसरात कौतुकाने चर्चा होत आहे.
नरवाडे परिवारातील या चौघांनी आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून पूर्ण केले. साधारण परिस्थितीतून पुढे येताना त्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिले. सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि वैद्यकीय क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले.
आर्थिक अथवा सामाजिक परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली, तरी योग्य ध्येय, कठोर परिश्रम आणि शिक्षणाची साथ असेल तर यश संपादन करता येते, हे नरवाडे परिवाराने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रात पोहोचलेल्या या कुटुंबाची वाटचाल परिसरातील विद्यार्थ्यांसाठी विशेषतः प्रेरणादायी ठरत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असा संदेश या यशातून मिळत आहे.
नरवाडे परिवाराच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, शिक्षण, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर परिस्थितीवर मात करता येते, हे या कुटुंबाने सिद्ध करून दाखवले आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis