मृत शेतकऱ्यांच्या वारसांनाही मिळणार कर्जमुक्तीचा लाभ
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ शासनाकडून मानक कार्यप्रणाली निश्चित नांदेड, २० ऑगस्ट (हिं.स.) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र ठरलेल्या, मात्र आधार प्रमाणीकरणापूर्वी मृत्यू झालेल
मृत शेतकऱ्यांच्या वारसांनाही मिळणार कर्जमुक्तीचा लाभ


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

शासनाकडून मानक कार्यप्रणाली निश्चित

नांदेड, २० ऑगस्ट (हिं.स.) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र ठरलेल्या, मात्र आधार प्रमाणीकरणापूर्वी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांबाबत राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अशा मृत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर वारसांची नोंद करून त्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार असून, पात्र वारसांना योजनेच्या निकषांनुसार कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.

राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन प्रणालीद्वारे करण्यात येत असून, महाआयटीमार्फत १६.९६ लाख पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापैकी १३.४८ लाख लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण सुरू आहे.

आधार प्रमाणीकरणापूर्वी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया

पहिल्या यादीतील काही पात्र शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरण पूर्ण होण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे संबंधित बँकांच्या निदर्शनास आले आहे. शासनाच्या नियमानुसार आधार प्रमाणीकरणाशिवाय कर्जमुक्तीचा लाभ देता येत नसल्याने अशा प्रकरणांमध्ये लाभ देण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.

त्यानुसार संबंधित मृत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर कायदेशीर वारसांची नोंद करण्यात येणार आहे.

त्यानंतर वारसांची आवश्यक माहिती संकलित करून ती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली जाईल. योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या वारसांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे आधार प्रमाणीकरणापूर्वी मृत्यू झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळणार असून, पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीच्या योजनेपासून वंचित राहावे लागणार नाही.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande