अमरावती - खोलापूर ग्रामपंचायत स्थलांतराचा ठराव ग्रामसभेत रद्द
अमरावती, 20 ऑगस्ट (हिं.स.)। स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत ग्रामपंचायत सध्याच्या जागेवरच ठेवण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला. स्थलांतर न करण्याच्या बाजूने २४६, तर स्थलांतर करण्याच्या
ग्रामपंचायत स्थलांतराचा ठराव ग्रामसभेत रद्द


अमरावती, 20 ऑगस्ट (हिं.स.)।

स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत ग्रामपंचायत सध्याच्या जागेवरच ठेवण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला. स्थलांतर न करण्याच्या बाजूने २४६, तर स्थलांतर करण्याच्या बाजूने केवळ १२ मते पडल्याने ग्रामपंचायत स्थलांतराचा विषय रद्द करण्यात आला. खोलापूर ग्रामपंचायत कार्यालयात १८ ऑगस्ट रोजी सर्वसाधारण ग्रामसभा, तर १७ ऑगस्ट रोजी महिला सभा घेण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय स्थलांतरित करण्याचा विषय सभेत चर्चेला आला. प्रस्तावित स्थलांतराच्या जागेच्या बाजूला ग्रामीण रुग्णालय, जिल्हा परिषद मुलांची शाळा, मागील बाजूस अंगणवाडी आणि समोर मशीद असल्याने याठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय हलविल्यास संबंधित संस्थांवर परिणाम होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. सचिवालयाच्या डागडूजीवर झालेल्या खर्चाची चौकशी सुरू असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याचाही विचार करण्याची मागणी करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्याने सचिवालय पाडण्याबाबतचा प्रस्ताव दिल्यानंतर जिल्हा परिषद, अमरावतीचे अभियंता देवरे यांनी पाहणी करून पाडकामाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्याच्या सूचना केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, त्यानंतरही सचिवालयाच्या डागडूजीवर मोठा खर्च करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यासर्व बाबींचा विचार करून ग्रामपंचायत स्थलांतराचा विषय रद्द करावा, तसेच अभियंत्यांच्या सुचनेनुसार सचिवालय पाडण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. मतदानावेळी २४६ ग्रामस्थांनी स्थलांतरास विरोध केला, तर १२ जणांनी स्थलांतराच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे ग्रामपंचायत सध्याच्या जागेवरच ठेवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande