
अमरावती, 20 ऑगस्ट (हिं.स.)
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमरावती जिल्ह्यातून एकमेव निवड झालेल्या पथ्रोट आयुष्यमान आरोग्यमंदिराशी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दुहेरी संवाद साधला. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आरोग्य संस्थेसोबत थेट जनसंवाद करण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये पथ्रोट येथील आयुष्यमान आरोग्यमंदिराची अमरावती जिल्ह्यातून एकमेव निवड करण्यात आली होती, हे विशेष. यावेळी ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या दुहेरी संवाद कार्यक्रमात आरोग्य समिती, आहार समिती, संस्थेत मिळणाऱ्या आरोग्यसेवा आणि सुविधा तसेच आरोग्यकेंद्रात राबवित असणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमांबाबत तसेच आरोग्यकेंद्रात असलेल्या आवश्यक समस्यांच्या बाबतीत सुद्धा वासंतीताई मंगरोळे, अतुल वाठ, नारायण इंगळे या समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून आरोग्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली. पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या समस्या मंत्री महोदयांनी ऐकून घेऊन त्याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचनासुद्धा दिल्या. यावेळी १०८ रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्याच्या मागणीवर आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखविली. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गोळे, डॉ. अर्चना गोळे, आहार समिती अध्यक्ष वासंतीताई मंगरोळे, प्राचार्य नारायण इंगळे, उपसभापती अतुल वाठ, यासह गावातील व परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी