
लातूर, 20 ऑगस्ट, (हिं.स.)- लातूर जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून जिल्ह्यातील महामार्गांवर दुचाकी चालविणाऱ्या चालकासह मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशालाही हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात येणार आहे. हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासोबतच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात १९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली. या बैठकीत लातूर जिल्ह्यातील रस्ते अपघातांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत ५२८ रस्ते अपघात झाले असून त्यापैकी २४३ अपघात प्राणांतिक असल्याचे बैठकीत निदर्शनास आले. विशेषतः दुचाकींच्या अपघातांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
दुचाकीस्वारांच्या सुरक्षेला प्राधान्य
रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी यापूर्वी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने आता महामार्गांवर हेल्मेट वापराची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ सप्टेंबरपासून दुचाकी चालक आणि मागील सीटवरील प्रवासी या दोघांनाही हेल्मेट वापरणे बंधनकारक राहणार आहे.
हेल्मेट वापराबाबत वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात येणार असून, त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक नियमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
पोलिसांनाही हेल्मेट आणि सीट बेल्ट सक्ती
दरम्यान, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार लातूर पोलीस दलातही सुरक्षित वाहतुकीसाठी शिस्तबद्ध अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी दुचाकी चालविताना हेल्मेट, तर चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्ट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी
रस्ता सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून प्रत्येक वाहनचालकाची सामूहिक जबाबदारी आहे. हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर हा केवळ दंडापासून वाचण्यासाठी नसून स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक आहे, असा संदेश लातूर पोलीस दलाने दिला आहे.
या बैठकीस पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर महानगरपालिका आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, कार्यकारी अभियंता, महामार्ग पोलीस, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. वाहतूक नियमांचे पालन करा, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर करा आणि अपघातमुक्त लातूरसाठी सहकार्य करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis