
वर्धा, 20 ऑगस्ट (हिं.स.)। नैसर्गिक साधनांचा योग्य वापर आणि सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करून भाजीपाला पिकात उत्पन्नाचा एक नवा मार्ग शोधून काढण्यात वर्धा जिल्ह्यातील केळापूर गावचे प्रयोगशील शेतकरी अशोकसिंह धुमाळे यांना मोठे यश आले आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी रानभाजी असलेल्या ‘करटुले’ पिकाची यशस्वी लागवड केली आहे. अशोकसिंह धुमाळे यांनी मे २०२५ मध्ये अवघ्या १० गुंठे क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने ३ महिन्यांच्या करटुले पिकाची लागवड केली होती. यासाठी त्यांनी स्वतः जंगलातून करटुल्याचे कंद व बियाणे जमा करून घरच्या घरी बियाणे तयार केले. करटुले पिकामध्ये नर व मादी वेलींचे योग्य प्रमाण असणे आवश्यक असते. हे लक्षात घेऊन धुमाळे यांनी दर १० मादी झाडांनंतर १ नर झाडाची शास्त्रीय पद्धतीने लागवड केली. या अचूक नियोजनामुळे पहिल्या वर्षी लागवडीनंतर अवघ्या दीड महिन्यातच फळधारणा सुरू झाली. सुरवातीला त्यांना आठवड्यातून २ वेळा तोडा करून प्रति तोडा ४ ते ५ किलो फळे मिळत होती. बाजारात करटुल्याला २०० ते २५० रुपये प्रति किलोचा उच्चांकी दर मिळाला.
अवघ्या १० गुंठ्यांच्या प्रयोगातून त्यांनी पहिल्याच वर्षी ४० हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळवून दाखवले. पहिल्या वर्षाच्या यशानंतर अशोकसिंह यांनी २०२६ मध्ये या पिकाचा विस्तार थेट १ एकर क्षेत्रावर केला. यासाठी त्यांनी मागील वर्षी स्वतः तयार केलेले ३ ते ३.५ किलो बियाणे मे महिन्यात पेरले. सध्या त्यांचा पहिला तोडा ८ किलो तर दुसरा तोडा १० किलोपर्यंत झाला आहे. आगामी ऑक्टोबर महिन्यापर्यंत दर आठवड्याला २ तोडे निघतील असा त्यांचा अंदाज आहे. सध्याही त्यांना २०० ते २५० रुपये किलोचा भाव मिळत असून, ते सर्व मालाची विक्री थेट बाजारात करत आहेत. अशोकसिंह धुमाळे यांनी अभ्यासू वृत्तीने, जंगलातील नैसर्गिक वनस्पतींचे संवर्धन करून सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून कमी खर्चात व कमी वेळेत भरघोस उत्पन्न मिळवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
सेंद्रिय पीक संरक्षण व कीड नियंत्रण
अशोकसिंह हे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करतात. लागवडीपूर्वी बियाण्यांवर त्यांनी ट्रायकोडर्माची जैविक प्रक्रिया केली. पिकाच्या बाल्यावस्थेत दर १०-१० दिवसांनी निमार्कच्या २ फवारण्या घेतल्या. पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतात फेरोमोन ट्रॅपचा वापर केला. कमी खर्चात आणि सेंद्रिय पद्धतीने घेतलेले हे करटुले पीक आज परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी