
छत्रपती संभाजीनगर, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
कळंब उपजिल्हा रुग्णालयातील फिजिशियन आणि भुलतज्ज्ञांची रिक्त पदे पूर्णवेळ तातडीने भरण्यात यावीत तसेच काही दिवसांपूर्वी उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या गंभीर घटनेबाबतही आरोग्यमंत्र्यांचे आमदार कैलास पाटील यांनी लक्ष वेधले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. आरोग्य मंत्री यांची मंत्रालयात भेट घेऊन कळंब उपजिल्हा रुग्णालयातील महत्त्वाच्या आरोग्यविषयक प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.
उपजिल्हा रुग्णालय, कळंब येथे तीन दिवसांपूर्वी बैठक घेऊन रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, मनुष्यबळ, उपलब्ध सुविधा आणि रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांचा सविस्तर आढावा आमदार कैलास पाटील यांनी घेतला होता.
बैठकीत रुग्णालयातील सेवा अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे ड्यूटी चार्ट दर्शनी भागात लावणे, रिक्त असलेले भूलतज्ज्ञ पद तातडीने भरणे, सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करणे तसेच पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्याने मुख्यालय सोडू नये, याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर आमदार कैलास पाटील यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत फिजीशियन व भूलतज्ञ ही पदे भरण्यात येतील असे आश्वासन दिले.
कळंबच्या नागरिकांना दर्जेदार, सक्षम आणि वेळेवर आरोग्यसेवा मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहिल असा विश्वास आमदार कैलास पाटील यांनी जनतेला दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis