
बीड, 20 ऑगस्ट (हिं.स.) : भविष्यातील पाण्याचे भीषण संकट टाळण्यासाठी आणि जलसंवर्धनाचे महत्त्व तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अंबाजोगाई शहरात उद्या, शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७.०० वाजता भव्य 'महा वॉकेथॉन'चे आयोजन करण्यात आले आहे. मृद व जलसंधारण विभाग बीड, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी आणि वसुंधरा सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेची सुरुवात होत आहे.
'वॉक फॉर वॉटर' या संकल्पनेवर आधारित ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजीव गांधी चौक आणि माता रमाई चौकमार्गे यशवंतराव चव्हाण चौकात पोहोचेल. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे ही आता आपली सामूहिक जबाबदारी बनली असून, या सामाजिक लढ्यात सर्वांनी उतरावे असे आवाहन करण्यात आले आहे. या वॉकेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व नागरिकांना टी-शर्ट, कॅप आणि प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष शेख शकील बागवान आणि सचिव राधेशाम लोहिया यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis