
- सीएसआर निधीतून 'आदर्श शाळे'ची उभारणी
- शिक्षण सभापती प्रीती रेवणे यांचा पुढाकार
अमरावती, 20 ऑगस्ट (हिं.स.)
अमरावती महानगरपालिका शाळांच्या विकासाला नवी दिशा देत महादेवखोरी येथील मनपा उच्च प्राथमिक मराठी सेमी-इंग्रजी शाळेचा सर्वांगीण कायापालट करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शिक्षण सभापती प्रीती हर्षल रेवणे यांच्या पुढाकारातून या शाळेची 'आदर्श शाळा' म्हणून निवड करण्यात आली असून, दिल्ली येथील व्हॉईस एनजीओच्या माध्यमातून सीएसआर निधीतून विविध विकासकामे केली जाणार आहेत.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज स्वच्छतागृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून, शिक्षण सभापती रेवणे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. प्रस्तावित विकासकामांमध्ये प्रशस्त व आधुनिक वर्गखोल्या, डिजिटल व इंटरॅक्टिव्ह क्लासरूम, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, खेळाचे मैदान आणि गार्डन यांचा समावेश आहे. तसेच सौर पॅनेल, आरओ प्रणाली, बोअरवेल रिचार्ज व्यवस्था आणि सेंद्रिय शेतीसारखे उपक्रमही राबविले जाणार आहेत. महापालिकेच्या ६३ शाळांपैकी ३० शाळांची विकासासाठी निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी मनपा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. शिक्षण सभापती रेवणे यांच्या पुढाकारातून 'वाचन कोपरा' हा उपक्रमही राबविला जात असून, विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. महादेवखोरी शाळेचा आठवीपासून दहावी आणि पुढे बारावीपर्यंत विस्तार करण्याचेही उद्दिष्ट आहे. त्यामुळे या उपक्रमातून मनपा शाळांना आधुनिक शिक्षणाचे नवे मॉडेल मिळण्याची अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी