
ठाणे , 20 ऑगस्ट, (हिं.स.)। ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (१) पदावर उपायुक्त मनीष जोशी यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला. त्यानुसार मनीष जोशी यांनी गुरुवारी सायंकाळी ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (१) पदाचा पदभार स्वीकारला. महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी जोशी यांचे अभिनंदन केले.
ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी हे जुलै २०२६ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. रिक्त पदावर नियुक्तीसाठी महापालिका प्रशासनाने उपायुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार निवड समितीची बैठक घेण्यात आली. उपलब्ध कागदपत्रे तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या सेवाविषयक नोंदींची छाननी केल्यानंतर मनीष जोशी यांच्या नावाची अतिरिक्त आयुक्तपदासाठी शिफारस करण्यात आली.
निवड समितीच्या शिफारशीला शासनाने मंजुरी देत मनीष जोशी यांची अतिरिक्त आयुक्त (१) पदावर पदोन्नतीने नियुक्ती केली. याबाबतचा शासन आदेश जारी झाल्यानंतर जोशी यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला.
अतिरिक्त आयुक्त (१) पदावरील सहावे अधिकारी
ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (१) पदावर आतापर्यंत विविध अधिकाऱ्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. मनीष जोशी हे या पदावर नियुक्त होणारे सहावे अधिकारी ठरले आहेत. यापूर्वी सुनील चव्हाण यांनी दोन वेळा, तर राजेंद्र अहिवर, गणेश एन. देशमुख आणि संदीप माळवी यांनी अतिरिक्त आयुक्त (१) म्हणून काम पाहिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर