छ. संभाजीनगर - पीक विमा न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचा इशारा
छत्रपती संभाजीनगर, 20 ऑगस्ट (हिं.स.)। खरीप २०२५ हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून तांत्रिक कारणांमुळे वंचित राहिलेल्या धाराशिव जिल्ह्यातील १४ महसूल मंडळांतील पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक विम्याचा लाभ द्यावा, या मागणीसाठी प्रदेश कार्यकारिण
Q


छत्रपती संभाजीनगर, 20 ऑगस्ट (हिं.स.)। खरीप २०२५ हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून तांत्रिक कारणांमुळे वंचित राहिलेल्या धाराशिव जिल्ह्यातील १४ महसूल मंडळांतील पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक विम्याचा लाभ द्यावा, या मागणीसाठी प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा तथा रुपामाता परिवाराचे संस्थापक अॅड. व्यंकट गुंड पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांची भेट घेऊन निवेदन दिले.

धाराशिव ग्रामीण, आंबेजवळगा, पाडोळी (आ.), जेवळी, धानोरी, मुरुम, अनाळा, शेलगाव, चिखली, पाचपिंपळा, सोनारी, आसू, शिराढोण आणि वाशी या १४ महसूल मंडळांतील हजारो पात्र शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्यानंतरही केवळ तांत्रिक त्रुटींच्या कारणास्तव शेतकऱ्यांना विम्याच्या लाभापासून दूर ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.

राज्य तांत्रिक सल्लागार समितीच्या अहवालातही संबंधित तांत्रिक त्रुटी निदर्शनास आल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे या १४ महसूल मंडळांतील सर्व पात्र शेतकऱ्यांना खरीप २०२५ च्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ तातडीने मंजूर करून नुकसानभरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांकडून वेळेवर विम्याचा हप्ता घेणाऱ्या विमा कंपन्यांनी नुकसान झाल्यानंतर मात्र तांत्रिक कारणे पुढे करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करू नये. शेतकऱ्यांकडून हप्ता घेऊन नुकसानभरपाईच्या वेळी नियम, तांत्रिक त्रुटी आणि प्रक्रियेच्या नावाखाली चालणारी ही टाळाटाळ म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय आहे. विमा कंपन्यांचा हा मनमानी कारभार तातडीने थांबवून पात्र शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा विमा मिळालाच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.

पीक विमा न दिल्यास बैलगाडी-ट्रॅक्टरसह भव्य मोर्चा

पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक विम्याचा लाभ मंजूर करण्यात आला नाही, तर १४ महसूल मंडळांतील शेतकरी, त्यांच्या कुटुंबातील सदस्य, बैलगाड्या आणि ट्रॅक्टरसह धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य प्रचंड मोर्चा काढण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अॅड. व्यंकट गुंड पाटील यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. प्रशासनाने आणि संबंधित पीक विमा कंपन्यांनी तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशासाठी आता केवळ निवेदने देऊन थांबणार नाही; गरज पडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही अॅड. गुंड पाटील यांनी दिला.

अन्यथा होणाऱ्या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि संबंधित पीक विमा कंपन्यांची राहील, असे निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले.

यावेळी शेतकरी सेना तालुकाध्यक्ष हनुमंत कदम, धनराज माने, प्रेमनाथ पाटील, सतीश मोटे, निवृत्ती कुदळे, कुमोद मुंडे, ज्ञानेश्वर कदम, अॅड. शरद गुंड, अमोल गुंड, नितीन शेवाळे यांच्यासह १४ महसूल मंडळांतील शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande