
परभणी, 20 ऑगस्ट (हिं.स.)। परभणी शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर महापालिका प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग शाखा आणि शहर वाहतूक पोलिसांची संयुक्त बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन महापौर सय्यद इकबाल यांनी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख तथा नगरसेविका अंबिका डहाळे यांनी महापौर सय्यद इकबाल यांची भेट घेऊन शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मांडला. शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्टेशन ते नानलपेठ मार्गावर सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. नारायण चाळ, गांधी पार्क, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील बाजारपेठेतही वाहनांच्या रांगा लागत आहेत. तसेच उड्डाणपूल आणि बसस्थानक मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वसमत रस्त्यावरील राजगोपालचारी उद्यानासमोरील श्री शिवाजी कॉम्प्लेक्स परिसरातील अतिक्रमणामुळेही वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे अंबिका डहाळे यांनी निदर्शनास आणून दिले. शिवशक्ती ते काळी कमान, वसमत रोड आणि जिंतूर रोडवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. महापालिका प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग शाखा आणि शहर वाहतूक पोलिसांसोबत संयुक्त बैठक घेऊन वाहतूक नियोजन, अतिक्रमण आणि रस्त्यांवरील अडथळ्यांबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर महापौर सय्यद इकबाल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, महापालिका कर्मचाऱ्यांचा संप संपल्यानंतर आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक तातडीने घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी वंदना कदम, संगीता टेहरे, कविता नांदुरे, दीपा बोरुळ, पूजा कापसे, संतोषी देवके, अर्चना जाधव, छाया गवारे, उज्वला शेंडे आदी उपस्थित होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis