
वर्धा, 20 ऑगस्ट (हिं.स.)। स्थानिक पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. गोविंदपूर शेत शिवारात सुरू असलेल्या एका हायप्रोफाइल जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मध्यरात्री छापा घालून तब्बल १९ आरोपींना रंगेहात अटक केली. या कारवाईत पोलिसांनी २७ लाख ५० हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदपूर येथील रहिवासी संजय सामरे हा आपल्या जामगाव-गोविंदपूर शेत शिवारातील शेतात असलेल्या टिनाच्या शेडमध्ये (बंड्यामध्ये) ५२ पत्त्यांचा पैशांवर हार-जितीचा मोठा जुगार चालवत असल्याची खात्रीशीर माहिती हिंगणघाटचे ठाणेदार अनिल राऊत आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाणेदार अनिल राऊत व त्यांच्या पथकाने मध्यरात्री शेतात छापा घातला. छापा पडताच पडताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच पळापळ झाली; मात्र पोलिसांनी वेढा घालत सर्वच्या सर्व १९ आरोपींना जाळ्यात पकडले. संजय ज्ञानेश्वर सामरे (वय ५०, रा. गोविंदपूर - शेतमालक), स्वप्नील ज्ञानेश्वरराव बालपांडे (वय ३२, रा. संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट), शेख सलमान शेख रहमान (वय ३२, रा. स्टेशन फैल, वर्धा), पंकज भारत बेलेकर (वय ३८, रा. समुद्रपूर), अंकुश गजानन येलमुले (वय ४८, रा. लसणपूर, ता. समुद्रपूर), प्रवीण नारायण पाटील (वय ३३, रा. समुद्रपूर) श्रीकृष्णा बबन राऊत (वय ३४, रा. समुद्रपूर), भारत चंद्रकांत उंडे (वय ३४, रा. रंगारी वार्ड, हिंगणघाट), सुनील विठ्ठलराव वरघणे (वय ४०, रा. अल्लीपूर), मुजिब शेरखाँ पठाण (वय ४५, रा. वायगाव हळद्या, ता. समुद्रपूर), अमरसिंग गुरुबच्चनसिंग भादा (वय २६, रा. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट), वसिम शकील कुरेशी (वय ४३, रा. अल्लीपूर), अतुल रूपराव शिरभाते (वय ४२, रा. छांगाणी नगर, जुना धामणगाव, अमरावती), सुरज विजय आस्कर (वय २८, रा. हनुमान वाॅर्ड, हिंगणघाट), पंकज विठ्ठलराव देवतळे (वय ३८, रा. ज्ञानेश्वर वाॅर्ड, हिंगणघाट), प्रवीण मधुकर चिडे (वय ४८, रा. हनुमान वार्ड, हिंगणघाट), आशिष माधवराव देशमुख (वय २४), अनिकेत माधवराव वनकर (वय २३), शुभम श्याम अंबेरे (वय ३०) तिघेही रा. इंदिरा गांधी वार्ड, हिंगणघाट) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत: पोलिसांनी घटनास्थळावरून आणि आरोपींच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात रोकड आणि वाहने जप्त केली आहेत. यामध्ये नगद रक्कम १ लाख ७३ हजार २३० रुपये, २४ लाख २० हजार रुपये किमतीची वाहने, मोबाईल व जुगार साहित्य असा एकूण २७ लाख ५० हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई हिंगणघाट येथील ठाणेदार अनिल राऊत व गुन्हे प्रगटीकरण पथकाचे नरेंद्र डहाके, श्रीकांत खडसे, दिनेश तुमाने, विनोद बुरिले, प्रवीण बोधाने, मुकेश येले, नरेंद्र आरेकर, नीलेशसिंग सूर्यवंशी, सागर सांगोले, प्रमोद जाधव, राजेंद्र ढगे, कुणाल टोणपे व आकाश कुमरे यांनी केली.
वर्धा व अमरावती जिल्ह्यातील जुगारी
गोविंदपूर शेतशिवारात करण्यात आलेल्या या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हिंगणघाटसह वर्धा, समुद्रपूर, अल्लीपूर आणि थेट अमरावती जिल्ह्यातील जुगाऱ्यांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी