
बीड, 20 ऑगस्ट, (हिं.स.)
अंबाजोगाई शहरातील मोची गल्ली, सदर बाजार परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ऋतिक देवदत्त चौधरी (रा. अंबाजोगाई) या तरुणावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. मागील दोन वर्षांपासून आरोपी ऋतिक हा पीडितेचा वारंवार पाठलाग करत होता. त्याने जबरदस्तीने तिचा मोबाईल नंबर मिळवला होता. त्याने इन्स्टाग्रामवर मेसेज करून तिला रात्री भेटण्यास बोलावले. आरोपीने यापूर्वीही वारंवार धमक्या दिल्यामुळे घाबरलेल्या पीडितेने घराबाहेर पडत दुर्गा माता मंदिराच्या पाठीमागील एका इमारतीत त्याची भेट घेतली.
भेटीदरम्यान आरोपीने पोलीस आपल्या मागावर असून आपण पुण्याला पळून जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने पीडितेला धमकावून व तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केले. या भयंकर प्रकारानंतर अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत पीडितेने घरी जाऊन घडलेला सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर कुटुंबाने तातडीने पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दिली. या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात आरोपी ऋतिक देवदत्त चौधरी याच्याविरुद्ध बीएनएस कलम ६४ (१), १३७ (२), ३५१ (२) तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४ व ६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास पिंक पथकातील सहा. पोलीस निरिक्षक शेंडगे करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis