
परभणी, 20 ऑगस्ट, (हिं.स.)। विविध प्रलंबित मागण्यांसाठी परभणी शहर महानगरपालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असून, मोठ्या संख्येने कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी संघटनेच्या वतीने गुरुवारी आंदोलनस्थळी ‘ठेचा-भाकर’ आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलनस्थळी महापौर सय्यद इकबाल यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या व आंदोलनामागील भूमिका जाणून घेतली. चर्चेनंतर महापौर सय्यद इकबाल यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आंदोलनस्थळी ठेचा-भाकरीचा आस्वाद घेतला. आपण कर्मचाऱ्यांसोबत असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शविला. महापौरांनी कर्मचाऱ्यांसोबत भोजन केल्याने आंदोलनस्थळी आपुलकीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी कर्मचारी संघटनेचे के. के. भारसाकळे, जालिंदर कांबळे, अनुसयाबाई जोगदंड यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis