
नागपूर, 20 ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते आणि नागपूरमधील ज्येष्ठ राजकीय कार्यकर्ते दिलीप पनकुले यांचे निधन झाले. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर घरी परतल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने नागपूरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.
दिलीप पनकुले हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर शहरातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. त्यांनी पक्षाचे माजी शहराध्यक्ष तसेच सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली होती. याशिवाय पक्षाचे राज्य पर्यवेक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जात होते. नागपूर महापालिकेच्या 2012 मधील निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीवरून पनकुले यांनी पक्षांतर्गत नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. तत्कालीन शहराध्यक्ष अजय पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. पक्षातील विविध प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2023 मध्ये फूट पडल्यानंतरही पनकुले यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्टपणे मांडली होती. आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार, असे त्यांनी जाहीर केले होते. पनकुले यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसने नागपुरात अनुभवी, ज्येष्ठ आणि पक्षाशी दीर्घकाळ निष्ठेने जोडलेला कार्यकर्ता गमावला आहे. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड