
४० टक्के कमिशनवर सरकारचे लक्ष असल्याचाही केला आरोप
नाशिक, 20 ऑगस्ट (हिं.स.)। यूपीए सरकारच्या काळातील ‘जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना’ बंद करून मोदी सरकारने त्याला ‘स्मार्ट सिटी’ असे नाव दिले. मात्र, स्मार्ट सिटीच्या नावाखाली नाशिक शहराचे पूर्णपणे विद्रूपीकरण झाले असून, सरकारचे लक्ष केवळ ४० टक्के कमिशनवर केंद्रित असल्याचा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यातील महानगरांमध्ये ‘माझं हक्काचं शहर’ अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत गुरुवारी (दि. २०) नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नाशिकमध्ये प्रवेश करतानाच अनुभव सांगताना चव्हाण म्हणाले, “समृद्धी महामार्गावरून बाहेर पडल्यानंतर ग्रामीण भागात तसेच नाशिक शहराच्या प्रवेशद्वारावरच रस्त्यांची बिकट अवस्था पाहायला मिळाली. शहरात योग्य दिशादर्शक फलक नाहीत आणि सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे. नाशिक हे खड्ड्यांचे शहर बनल्याचे ऐकत होतो; मात्र, आज त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला, असे त्यांनी म्हटले. तर आमदारांच्या पक्षांतरावर देखील त्यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केला. “आमदार खरेदी करण्यासाठी ५० कोटी रुपये येतात कुठून? नाशिककर आणि नागरिक खूप सोशिक झाले आहेत. सरकारने पक्षांतरबंदी कायदा धाब्यावर बसवून लोकशाहीची धिंडवडे उडवले आहेत. लोकशाही जिवंत राहते की नाही, अशी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे,” असे चव्हाण यांनी म्हटले.
‘जेन झी’ आणि तरुण शांत बसणार नाहीत
तरुणांच्या अलीकडील आंदोलनांचा उल्लेख करत चव्हाण यांनी सरकारला इशारा दिला. “जेन झी आणि आजची नवी पिढी आता गप्प बसणार नाही. तरुण वर्ग अन्याय सहन करणार नाही. सरकार उत्तरे देणार नाही, पण तरुण ही उत्तरे मागितल्याशिवाय राहणार नाहीत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तसेच नाशिककरांना अन्यायाविरोधात जागे करण्यासाठीच ‘माझं हक्काचं शहर’ हे अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील मूलभूत प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था आणि पायाभूत सुविधांबाबत नागरिकांनी आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
नाशिकची ओळख आता ‘खड्ड्यांचे शहर’
आगामी सिंहस्थ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पायाभूत सुविधांची मोठी वानवा असून, शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नाशिकची ओळख आता ‘खड्ड्यांचे शहर’ अशी निर्माण झाली आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी आणि नाशिककरांच्या हक्कांसाठी नाशिककरांना खडबडून जागे करण्याची हीच वेळ आहे. यासाठी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या ‘हक्काचे शहर’ या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देखील चव्हाण यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI