रायगड - ग्रामसभा नकोच; ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा राज्यव्यापी बहिष्कार
रायगड, 20 ऑगस्ट, (हिं.स.)। ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर वाढता दबाव येत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डीएनई १३६ यांनी राज्यभर ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांन
No Gram Sabhas at all! — Gram Panchayat officials' state-wide boycott.


रायगड, 20 ऑगस्ट, (हिं.स.)। ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर वाढता दबाव येत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डीएनई १३६ यांनी राज्यभर ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ग्रामसभेचे आयोजन करू नये, असे निर्देश संघटनेच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील शिवराई ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांच्यावर ग्रामसभेदरम्यान वाढता दबाव आल्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डीएनई १३६ यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर संघटनेची तातडीची बैठक घेण्यात आली. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर ग्रामसभांमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित दबाव येऊ नये, तसेच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने हाताळण्यात यावा, या मागणीसाठी राज्यभर ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयासंदर्भात मंत्रालयातील संबंधित विभाग, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सभापती तसेच गटविकास अधिकारी यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना ग्रामसभा घेताना निर्माण होणाऱ्या अडचणी आणि दबावाच्या परिस्थितीबाबत शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.

दरम्यान, खालापूर येथे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सभापती कृष्णा पारंगे आणि गटविकास अधिकारी संदीप कराड यांची भेट घेऊन निवेदन साद केले. यावेळी राज्य संघटनेच्या निर्णयाची माहिती देण्यात आली. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या कामकाजाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande