बाभूळगाव जिल्हा परिषद शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले
नांदेड, २० ऑगस्ट (हिं.स.) : नांदेड तालुक्यातील बाभूळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत परिपाठ सुरू असतानाच वर्गाच्या स्लॅबचे प्लास्टर निखळून पडल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, शाळेच्या इमारतीच्या सुरक्षितते
बाभूळगाव जिल्हा परिषद शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले


नांदेड, २० ऑगस्ट (हिं.स.) : नांदेड तालुक्यातील बाभूळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत परिपाठ सुरू असतानाच वर्गाच्या स्लॅबचे प्लास्टर निखळून पडल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, शाळेच्या इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या शाळेत सुमारे १७० विद्यार्थी आणि आठ शिक्षक आहेत. शाळेच्या इमारतीची अवस्था खराब झाली असून, पावसाळ्यात भिंतींमधून पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. मात्र, अद्याप याबाबत ठोस कार्यवाही झालेली नसल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

स्लॅबचे प्लास्टर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत निखळल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेच्या इमारतीची तातडीने पाहणी करून धोकादायक भागाची दुरुस्ती करावी, अशी मागणी पालक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींकडून होत आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande