
परभणी, 20 ऑगस्ट (हिं.स.)। इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करताना योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी या बाबींना महत्त्व दिल्यास यशाचा मार्ग निश्चितच सुकर होतो, असे प्रतिपादन डॉ. महेश पाटील यांनी केले.
मराठवाडा हायस्कूल, शिवाजीनगर, परभणी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेची तयारी, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि भविष्यातील करिअरच्या संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. पाटील म्हणाले की, दहावीमध्ये उत्कृष्ट यश मिळविणे कठीण नाही. त्यासाठी प्रामाणिकपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचे कोणतेही टेन्शन न घेता आत्मविश्वासाने अभ्यास करावा. योग्य दिशा, सातत्यपूर्ण मेहनत आणि सकारात्मक विचारसरणीच्या बळावर अपेक्षित यश मिळविता येते. बोर्ड परीक्षेची तयारी करताना प्रत्येक विषयातील प्रकरणांचे गुणदान, महत्त्वाचे घटक, वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि महत्त्वाच्या संकल्पना यांचा अभ्यास करावा. त्याचबरोबर स्वतःच्या नोंदी तयार करून नियमित पुनरावृत्ती व लेखनाचा सराव करणे आवश्यक आहे. उर्वरित कालावधीचे योग्य वेळापत्रक तयार करून त्यानुसार अभ्यास केल्यास अपेक्षित ध्येय गाठणे सहज शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपली आवड व क्षमता ओळखून भविष्यातील ध्येय निश्चित करावे, असे आवाहन करताना डॉ. पाटील यांनी एम्ससारख्या देशातील नामांकित वैद्यकीय संस्थांमधील सुविधा, आरोग्यसेवेतील आधुनिक तंत्रज्ञान तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विविध करिअरच्या संधींची माहिती विद्यार्थ्यांना दिली. अभ्यास अधिक आनंददायी करण्यासाठी शैक्षणिक व्हिडिओ, माहितीपट, प्रश्नमंजुषा, संदर्भग्रंथ आणि विविध ज्ञानवर्धक उपक्रमांचा उपयोग करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. मनोरंजन आणि अभ्यास यामध्ये योग्य समतोल राखल्यास अभ्यास अधिक प्रभावी होतो, असे त्यांनी नमूद केले. “विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवावा. अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकावे. आत्मविश्वास, जिद्द, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य नियोजन यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते,” असा प्रेरणादायी संदेश डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमास पर्यवेक्षक सूर्यकांत पाटील, पर्यवेक्षक शिवाजी आरळकर, सहायक पर्यवेक्षक सुनील रामपूरकर, गोपाळ रोडे, शिवप्रसाद कोरे, अमोल गोरकट्टे, सागर सुडके, श्रीमती गायकवाड, राजेश उफाडे आदी उपस्थित होते. इयत्ता दहावीच्या सेमी इंग्रजी, संस्कृत व हिंदी माध्यमातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis