
यवतमाळ 20 ऑगस्ट (हिं.स.)। ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचा-यांवर चक्क १० ते १२ जणांच्या जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली. लोखंडी रॉड घेऊन हल्लेखोर डॉक्टरांच्या दिशेने धावल्याने डॉ. दीक्षा मुजमुले आणि नर्सिंग ऑफिसर पूनम कोकरे यांनी डिलिव्हरी रूममध्ये धाव घेत स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले. तर नर्सिंग ऑफिसर प्रशीक काळबांडे यांना लोखंडी रॉड तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील अंबोडा येथील शेख इसराइल शेख शाबुद्दीन (वय ३०) हा मंगळवारी अपघातात जखमी झाला होता. दरम्यान, त्याला रात्री सुमारे १० वाजता ड्रेसिंगसाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. नर्सिंग ऑफिसर पूनम कोकरे यांनी ड्रेसिंग व उपचार केले. परंतु त्याचे समाधान झाले नाही. यावरून त्याने उपस्थित डॉक्टर, कर्मचा-यांशी वाद घातला. ‘तुम्हाला हिसाब दाखवतो, ’ असे म्हणून तो रुग्णालयातून बाहेर पडला. काही वेळातच दहा ते १२ जणांना सोबत घेऊन त्याने पुन्हा रुग्णालयात येथून गोंधळ, मारहाण आणि तोडफोड सुरू केली. हल्लेखोरांनी रुग्णालयातील काचा फोडून तोडफोड सुरू केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. दीक्षा मुजमुले, नर्सिंग ऑफिसर पूनम कोकरे दोघींनी डिलिव्हरी रूममधील बाथरूममध्ये लपून बसल्या. दरम्यान, हल्लेखोरांनी ‘डॉक्टर कुठे लपल्या आहेत’, अशी विचारणा करीत नर्सिंग ऑफिसर प्रशीक काळबांडे यांना लोखंडी रॉड तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या पोटरीवर मोठी दुखापत झाली असून, शरीरावर अनेक जखमा आहेत. रक्तस्राव झाल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता अन्य रुग्णालयात हलविण्यात आले. हल्लेखोरांनी थेट डिलिव्हरी रूमच्या काचा फोडत मारून टाकण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरून गेलेल्या डॉ. दीक्षा मुजमुले आणि पूनम कोकरे यांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. परंतु पोलिस पोहचेपर्यंत हल्लेखोरांनी रुग्णालयातून पळ काढला. तत्पूर्वी हल्लेखोरांनी आरोग्य कर्मचार्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर जाऊन त्यांच्या दरवाजांचीही तोडफोड केल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, महागाव पोलिस ठाण्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. दीक्षा मुजमुले यांनी तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी शेख इसराइल शेख शाबुद्दीन व इतरांविरुद्ध गुन्हे नोंद केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अंबुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचा-यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून, आरोग्यसेवा देणारेच सुरक्षित नसतील तर रुग्णांची सेवा कशी करायची, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी