
- ‘विचारही गोठवा’ या व्यंगचित्रातून उबाठा गटावर बोचरा प्रहार
मुंबई, 20 ऑगस्ट (हिं.स.) - उबाठा गटाने काल न्यायालयात शिवसेनेचे पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ गोठवण्याची मागणी केल्यानंतर, शिवसेनेने सोशल मीडियावर एक व्यंगचित्र प्रसिद्ध करत उबाठावर सणसणीत प्रहार केला आहे.
या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे न्यायालयासमोर ‘यांच्याकडे बाळासाहेबांचे विचारही आहेत, तेही गोठवा,’ असे म्हणताना दाखवण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला भगवा ध्वज, धनुष्यबाणासह वाघ आणि शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखवण्यात आले आहेत. आकाशात बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे सुरू असल्याचा संदेश देण्यात आला आहे.
बाळासाहेबांचे हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि राष्ट्रहिताचे विचार शिवसेनेच्या राजकीय वाटचालीचा आधार राहिले आहेत. हे विचार कोणाच्या मालकीचे नसून शिवसैनिकांच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत, असा संदेश व्यंगचित्रातून देण्यात आला आहे. ‘पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या राजकारणासोबत बाळासाहेबांचे विचारही गोठवणार का?’ असा सवाल यातून उपस्थित करत व्यंगचित्रातून उबाठा गटाच्या भूमिकेवर निशाणा साधण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी