
अमरावती, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
शहरातील वाढत्या चोरीच्या घटना, वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका, महिला व मुलींची सुरक्षा, अमली पदार्थांचा वाढता धोका तसेच सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर दर्यापूर शहरातील सुरक्षाव्यवस्था अ धिक सक्षम करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. गटनेते प्रदीप मलिये यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलिस अधिकारी, दर्यापूर यांना निवेदन देऊन विशेष पोलिस उपाययोजना व संयुक्त सुरक्षा पाहणी मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली.
शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गुन्हे घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ते घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. रिद्धपूर येथे बसखाली येऊन चिमुकल्या मुलीचा झालेला मृत्यू लक्षात घेता शाळा-महाविद्यालये, बस थांबे, बाजारपेठा व गर्दीच्या ठिकाणी वाहतूक सुरक्षेचा विशेष आढावा घेण्याची मागणी करण्यात आली. महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षित मार्ग निश्चित करून त्या मार्गांवर नियमित पोलिस गस्त ठेवावी. शाळा व महाविद्यालय परिसरात विशेष बंदोबस्त वाढवावा. अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविणे, बेकायदेशीर रेसिंग व धोकादायक वाहन चालविणाऱ्यांवर विशेष तपासणी मोहीम राबवून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. संवेदनशील व रहिवासी भागांमध्ये, विशेषतः रात्रीच्या वेळी, पोलिस गस्त व नाकाबंदी वाढवावी. गुन्हेगारी व अपघातप्रवण ठिकाणांचे सर्वेक्षण करून आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि नियमित गस्त उपलब्ध करून द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
अमली पदार्थांची विक्री, सेवन व पुरवठा करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करावी. ज्येष्ठ नागरिकांना बनावट फोन, ऑनलाइन फसवणूक व सायबर गुन्ह्यांपासून सावध करण्यासाठी जनजागृती अभियान राबवावे, अशी मागणीही करण्यात आली. प्रमुख चौकांवरील वाहतूक कोंडी व अपघातप्रवण ठिकाणांचे सर्वेक्षण करून गर्दीच्या वेळेत अतिरिक्त वाहतूक पोलिस नियुक्त करावेत. नागरिकांच्या समस्या थेट मांडण्यासाठी महिन्यातून किमान एकदा नागरिक-पोलिस संवाद बैठक घ्यावी. तसेच पोलिस प्रशासन, नगरपरिषद व संबंधित विभागांच्या सहभागातून संयुक्त सुरक्षा पाहणी मोहीम राबवून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देतेवेळी प्रदीप मलिये, गोपाल अरबट, प्रदीप वडतकर, बापूसाहेब साबळे, डॉ. दिनेश म्हाला, नगरसेवक सतीश सावळे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी