
अमरावती, २० ऑगस्ट (हिं.स.) : तळेगाव ते विष्णोरा हा सुमारे तीन किलोमीटरचा रस्ता गेल्या वर्षभरापासून अत्यंत दयनीय अवस्थेत असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून अनेक भागांतील डांबर पूर्णपणे उखडले आहे.
पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, वाहतूकही धोकादायक बनली आहे.
पोरगव्हाण आणि विष्णोरा येथील पहिली ते बारावीपर्यंतचे सुमारे १०० ते १५० विद्यार्थी दररोज स्कूल बसने याच मार्गाने चांदूरबाजार येथे शिक्षणासाठी जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.
दररोज एका बसमधून ३० ते ४० विद्यार्थी प्रवास करत असताना कोणत्या खड्ड्यात वाहन अडकेल किंवा अपघात होईल, याची भीती असल्याचे एका स्कूल बसचालकाने सांगितले. खराब रस्त्यामुळे बस चालविताना विशेष काळजी घ्यावी लागत असल्याचेही त्याने नमूद केले.
अपघातांच्या घटनांमुळे ग्रामस्थ चिंतेत
या मार्गावरून दोन्ही गावांतील नागरिक बाजारपेठ, दवाखाना आणि इतर दैनंदिन कामांसाठी नियमित प्रवास करतात. गेल्या वर्षभरात रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या मार्गावर अनेक छोटे-मोठे अपघात झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार लेखी तसेच तोंडी तक्रारी करण्यात आल्या. मात्र, अद्याप ठोस दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सात दिवसांची मुदत; अन्यथा तीव्र आंदोलन
येत्या सात दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजवून दुरुस्तीचे काम सुरू न केल्यास विद्यार्थी, पालक आणि नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
भविष्यात या रस्त्यावर दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. “विद्यार्थ्यांच्या जीवापेक्षा रस्त्यावरील डांबर महाग आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला असून, प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी