
यवतमाळ, 20 ऑगस्ट (हिं.स.) नवीन अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणासाठी शिक्षकांना तीन दिवसांचे प्रशिक्षण बंधनकारक करण्यात आले असताना एकशिक्षकी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अध्यापनाची पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कुंभा जिल्हा परिषद केंद्रांतर्गत महागाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सलग दोन दिवस गैरहजर राहिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी गावातील युवकांनाच पुढाकार घेऊन शाळा भरवावी लागल्याचा प्रकार समोर आला आहे.
मारेगाव तालुक्यातील दुसरीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने १८, १९ व २० ऑगस्ट रोजी शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. एकशिक्षकी शाळेतील शिक्षकांनी सकाळच्या सत्रात शाळा घेऊन दुपारी प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावे, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, महागावच्या शाळेत शिक्षक दोन दिवसांपासून उपस्थित नसल्याचे युवकांच्या निदर्शनास आले. शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असून सुमारे २५ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शिक्षकच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे लक्षात येताच युवकांनी शाळेची जबाबदारी तात्पुरती स्वीकारत विद्यार्थ्यांना एकत्र करून शाळा भरविली. वर्गखोल्या उघडण्यापासून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीपर्यंतची जबाबदारी गावकर्!यांकडून पार पाडली जात असल्याचे युवकांचे म्हणणे आहे. शिक्षकांना प्रशिक्षण देणे ही शैक्षणिक गुणवत्तेसाठी आवश्यक बाब आहे. मात्र, एकशिक्षकी शाळेतील शिक्षक प्रशिक्षणासाठी जात असताना त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे अध्यापन कोण करणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. महागावातील प्रकार समोर आला असला तरी इतर दुर्गम व एकशिक्षकी शाळांमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे का, याची तपासणी होणे गरजेचे आहे. शिक्षक प्रशिक्षण, प्रशासकीय कामे किंवा अन्य कारणांमुळे गैरहजर राहिल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने प्रत्येक एकशिक्षकी शाळेसाठी पर्यायी शिक्षकाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. महागावातील प्रकाराची शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी