
प्रलंबित प्रकरणांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेला तातडीने कार्यवाहीच्या सूचना
बीड, 20 ऑगस्ट (हिं.स.) : बीड जिल्ह्यातील विविध वित्तीय संस्थांमध्ये अडकलेल्या ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाहीला वेग देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हादंडाधिकारी, बीड यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीस पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी (एमपीआयडी) तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखा तसेच गुन्हे अन्वेषण विभागामार्फत संबंधित प्रकरणांमध्ये तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम, 1999 (एमपीआयडी-ऍक्ट) अंतर्गत आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले. विविध वित्तीय संस्थांच्या स्थावर व जंगम मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, काही प्रकरणे विशेष न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत.
उर्वरित प्रकरणांमध्येही आवश्यक कार्यवाही सुरू असून, ठेवीदारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासनाकडून कायदेशीर प्रक्रियेनुसार प्रयत्न सुरू आहेत. अडकलेल्या ठेवी परत मिळवून देण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांना समन्वयाने आणि तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis