
नांदेड, 20 ऑगस्ट (हिं.स.)।कंधार तालुक्यातील कंधार बहादरपुरा- दिग्रस-जांब-जळकोट राज्य मार्ग क्र. 250 वरील मन्याड नदीवरील बहादरपुरा गावाजवळील मोठ्या पुलावरील वाहतुक पुर्णतः बंद ठेवण्याबाबत जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे.
या अधिसुचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रस्तावीत केल्याप्रमाणे अपघाताची शक्यता असल्यामुळे पुलावरून सर्व वाहनाची वाहतुक बंद करणे संयुक्तिक राहील. दरम्यानच्या कालावधीमध्ये वाहतुक कंधार घोडज मार्गे फुलवळ अशी पुढील प्रमाणे वळविणे आवश्यक होते.सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रतिबंध करण्यात आलेला मार्ग मन्याड नदिवरील बहादरपुरा पुल रस्ता ते बिजेवाडी फाटा असून पर्यायी मार्ग कंधार-घोडज मार्गे फुलवळ हा राहील.
मोटार वाहन कायदा 1999 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधीत विभागाने पुढील उपाय योजना करुन राज्य महामार्ग 250 मन्याड नदीवरील बहादरपुरा पुल रस्ता ते बिजेवाडी फाटा हा मार्ग सर्व वाहनाच्या वाहतुकीसाठी बंद राहील यास मान्यता दिली आहे. तसेच वर नमुद केलेल्या कंधार-घोडज मार्गे फुलवळ या पर्यायी मार्गाने वाहने वळविण्यास मान्यता दिली आहे.
पोलीस अधिक्षक नांदेड यांनी कायदा व सुव्यस्थेच्या अनुषंगाने आवश्यक ती उपाययोजना करावी. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांनी रस्ता वाहतुक प्रतिबंध व पर्यायी रस्त्यासाठी आवश्यक असलेले बोर्ड, चिन्ह लावणे इत्यादी बाबतची कार्यवाही करावी. सदरील मार्ग एक महिण्याचे कालावधीपेक्षा जास्त काळासाठी बंद राहणार असल्याने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांनी सदरील अधिसुचना राजपत्रात प्रसिध्द करुन तसा अनुपालन अहवाल सादर करावा, असेही अधिसूचनेत नमूद केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis