
अमरावती, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीच्या भाड्याच्या खोलीतून लॅपटॉप आणि तीन महागडे मोबाइल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना शहर गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल १ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. निखिल विलास ताठे (२१, रा. महेंद्र कॉलनी) आणि शेख नजीर शेख कदीर (२९, रा. जमीला नगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.गाडगेनगर परिसरात भाड्याने राहणाऱ्या प्रतीक्षा (२५) यांच्या खोलीतून १९ मे रोजी अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप आणि तीन महागडे मोबाइल लंपास केले होते. याप्रकरणी गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहर गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला.तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. दरम्यान, एक तरुण चोरीचा लॅपटॉप विक्रीसाठी इतवारा बाजार परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून निखिल ताठे याला ताब्यात घेतले.चौकशीत त्याने चोरीची कबुली दिल्यानंतर त्याच्या साथीदाराची माहिती मिळाली. त्यानंतर शेख नजीर शेख कदीर यालाही अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींकडून १ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गाडगेनगर पोलिस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी