
लातूर, 20 ऑगस्ट, (हिं.स.)। गांजा विक्रीच्या उद्देशाने सुमारे सहा किलो गांजा बाळगणाऱ्या आरोपीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर यांनी दोन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला आणखी एक महिना कारावास भोगावा लागणार आहे. औसा पोलिसांनी केलेल्या प्रभावी तपासामुळे या प्रकरणात आरोपीला शिक्षा झाली आहे.
रूपसिंग सुभाष राठोड (वय २१, रा. करजगुंठी तांडा, ता. मन्नूर, जि. मेडक, तेलंगणा) हा ३१ ऑगस्ट २०१६ रोजी सायंकाळी सुमारे पावणेसातच्या सुमारास औसा शहरातील नागरसोगा मोड परिसरात संशयास्पदरीत्या आढळून आला होता. पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे सुमारे ६ किलो वजनाचा हिरवट रंगाचा बी-मिश्रित गांजा आढळून आला. हा गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१९/२०१६, कलम २०(ब) एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांच्या पुराव्यांना न्यायालयाची मान्यता
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन औसा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. वाय. धुमाळे यांनी केला. उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर कायदेशीर बाबींच्या आधारे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान प्रत्यक्षदर्शी पोलीस साक्षीदार, सरकारी पंच, तपासी अंमलदार यांच्या साक्षी तसेच रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल महत्त्वाचा ठरला. या भक्कम पुराव्यांच्या आधारे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी आरोपीला दोषी ठरवत दोन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सरकारी पक्षाकडून प्रभावी युक्तिवाद
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी अभियोक्ता एस. आर. मुंदडा यांनी न्यायालयात प्रभावी बाजू मांडली.
खटल्याच्या यशस्वी न्यायालयीन पाठपुराव्यासाठी ट्रायल मॉनिटरिंग सेलचे सहायक पोलीस निरीक्षक शिवशंकर मनाळे यांनी काम पाहिले. औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रेवणनाथ डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक कडगे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.
अमली पदार्थांविरोधात कारवाई सुरूच
अवैध अमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध लातूर पोलीस दलाकडून कठोर कारवाई सुरू आहे. अशा गुन्ह्यांमध्ये प्रभावी तपास करून न्यायालयीन पाठपुरावा करण्यासह दोषींना शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis