
नाशिक, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. दर्शनासाठी आर्थिक व्यवहार करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिला. यंदाच्या पहिल्या श्रावणी सोमवारी नेहमीपेक्षा मोठी गर्दी झाल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आला. त्र्यंबकरोडवरील एका मार्गाचे काम सुरू असून, दुसरा मार्ग वन-वे असल्याने वाहतूक कोंडी झाली. पुढील काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अधिक प्रभावी नियोजन केले जाईल, असे महाजन यांनी स्पष्ट केले.
महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वरमधील दर्शन व्यवस्था, सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी, आरोग्य सुविधा, रस्ते कामांचा दर्जा आणि राजकीय आरोपांवर भाष्य केले. दर्शनासाठी पैसे घेणे ही गंभीर बाब असून, अशा प्रकारे आर्थिक व्यवहार करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणार्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्र्यंबक येथील रुग्णालयाचे स्थलांतर होत असले तरी नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध राहावी यासाठी त्याच परिसरात 100 मीटरच्या अंतरात दुसरे रुग्णालय भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. दोन्ही ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. सिंहस्थ काळात आरोग्य व्यवस्थेत कोणतीही कमतरता राहणार नाही, अशी ग्वाही महाजन यांनी दिली.2,270 कोटी रुपयांच्या रस्ते कामांच्या दर्जाची चौकशी करण्यासाठी शासनाने नागपूर येथील चार अधिकार्यांची समिती नियुक्त केली असेल तर चांगलच आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. हीच आमची भूमिका आहे. साधू-महंतांच्या सूचनांनुसारच कुंभमेळ्याची कामे सुरू असल्याचे सांगत गोदावरी बारा महिने वाहती ठेवण्याचे नियोजन असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले.31 ऑक्टोबरच्या कुंभमेळा ध्वजारोहणासाठी देशातील वरिष्ठ नेत्यांना निमंत्रित करण्यासाठी पुढील आठवड्यात दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकला राज्यातील सर्वांत सुंदर शहर करण्याचे आपले वचन असल्याचेही महाजन म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI