रत्नागिरी : उक्षी स्थानकावर पॅसेंजर गाडी थांबण्यासाठी संघर्ष समिती
रत्नागिरी, 20 ऑगस्ट (हिं.स.) । कोकण रेल्वेमार्गावर उक्षी येथे पॅसेंजर गाडी थांबविण्यासाठी लढा उभारण्यात येणार असून उक्षी पंचक्रोशी रेल्वे संघर्ष समितीच्या कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. उक्षी रेल्वे स्थानकावर दिवा–सावंतवाडी आणि सावंतवाडी–दि
उक्षी स्थानकावर पॅसेंजर गाडी थांबण्यासाठी संघर्ष समिती


रत्नागिरी, 20 ऑगस्ट (हिं.स.) । कोकण रेल्वेमार्गावर उक्षी येथे पॅसेंजर गाडी थांबविण्यासाठी लढा उभारण्यात येणार असून उक्षी पंचक्रोशी रेल्वे संघर्ष समितीच्या कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे.

उक्षी रेल्वे स्थानकावर दिवा–सावंतवाडी आणि सावंतवाडी–दिवा या दोन्ही गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या जनआंदोलनाला आता संघटनात्मक स्वरूप प्राप्त झाले आहे. उक्षी पंचक्रोशी रेल्वे संघर्ष समितीच्या कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून रेल्वे थांब्याच्या मागणीसाठी अधिक व्यापक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

उक्षी पंचक्रोशीतील सुमारे २५ गावांसाठी उक्षी रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे प्रवासी केंद्र आहे. या स्थानकावर उक्षी परिसरासह परचुरी, वांद्री, करबुडे, बावनदी, कोळंबे, आंबेड, सोनगिरी, मानसकोंड, कुरधुंडा, चाफे, ओरी, जाकादेवी, पोचरी, देण,खालगाव, फुणगूस, डिंगणी, रानपाट, लाजुल, सप्तलिंगी, नरबे, कोंड्ये, पिरंदवणे, उजगाव, नांदळज, कोसुंब, ताम्हाणे, आंबवली आदी भागांतील नागरिक प्रवासासाठी अवलंबून आहेत.

पूर्वी या स्थानकावर या गाड्यांना थांबा मिळत होता. मात्र, कोरोना महामारीनंतर या गाड्यांचे उक्षी स्थानकावरील थांबे बंद करण्यात आले. परिणामी पंचक्रोशीतील नोकरदार, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा, यासाठी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने मागणी करण्यात येत आहे.

उक्षी पंचक्रोशी रेल्वे संघर्ष कमिटीच्या माध्यमातून प्रशासन, कोकण रेल्वे आणि संबंधित लोकप्रतिनिधींकडे प्रभावीपणे पाठपुरावा करण्यासाठी कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. मुझम्मील काझी यांची अध्यक्षपदी, तर हरिश्चंद्र बंडबे आणि प्रदीप चंदरकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. रमेश मेस्त्री सचिव, अब्दुल मुनाफ खतिब सहसचिव, तर अविनाश कळंबटे खजिनदार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. कार्यकारिणीचे अन्य सदस्य असे - संघटक वसंत मेस्त्री, चंद्रकांत वेद्रे, कायदेशीर सल्लागार ॲड. अरुण नागवेकर, सल्लागार अनंत कळंबटे, गोविंद कळंबटे, प्रवक्ते शरद जाधव, सुरेश कळंबटे. सदस्य सत्यवान वेद्रे, रवींद्र जाधव, उदय बेनकर, नंदकुमार कुवार, गजानन पानगले, पांडुरंग पाताडे, जगन्नाथ दुदम, संदीप सापटे, नितीन चंदरकर आणि प्रकाश शिगवण.

उक्षी स्थानकावर बंद झालेले रेल्वे थांबे पुन्हा सुरू व्हावेत, हा केवळ उक्षी गावाचा प्रश्न नसून संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाशी निगडित महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे या मागणीला व्यापक जनसमर्थन मिळवून देणे, प्रवाशांच्या अडचणी प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आणि रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणे या दिशेने संघर्ष समिती काम करणार आहे. तसेच गावागावातून सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande