जलजीवन मिशनच्या कामांत अनियमिततेचा भाजपचा आरोप; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
पुणे, 20 ऑगस्ट (हिं.स.)। केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘जलजीवन मिशन’ योजनेअंतर्गत इंदापूर तालुक्यात सुरू असलेल्या कामांमध्ये गंभीर अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचा आरोप भाजपच्या इंदापूर तालुका पश्चिम मंडळाने केला आहे. या कामांची उच्चस्तरीय चौकशी
जलजीवन मिशनच्या कामांत अनियमिततेचा भाजपचा आरोप; उच्चस्तरीय चौकशीची मागणी


पुणे, 20 ऑगस्ट (हिं.स.)।

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘जलजीवन मिशन’ योजनेअंतर्गत इंदापूर तालुक्यात सुरू असलेल्या कामांमध्ये गंभीर अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचा आरोप भाजपच्या इंदापूर तालुका पश्चिम मंडळाने केला आहे. या कामांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

या संदर्भात भाजप इंदापूर तालुका पश्चिम मंडळाचे अध्यक्ष तेजस देवकाते यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपअभियंत्यांना निवेदन दिले आहे. तालुक्यातील कळस, शेटफळगढे, निमसाखर, वडापुरी, मदनवाडी यांसह अन्य गावांमध्ये झालेल्या जलजीवन मिशनच्या कामांची सखोल तपासणी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

कामांची तांत्रिक तपासणी, निविदा प्रक्रिया, मोजमाप पुस्तिका, गुणवत्ता अहवाल, संबंधित कंत्राटदारांना करण्यात आलेली देयके तसेच प्रत्यक्ष कामाची पाहणी करून पडताळणी करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

देवकाते म्हणाले, “महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरवण्यासाठी केंद्र सरकारने जलजीवन मिशनअंतर्गत तालुक्याला मोठा निधी दिला. मात्र, या योजनेअंतर्गत झालेल्या कामांची स्थिती चिंताजनक आहे. सर्व कामांची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.”

जलजीवन मिशनच्या कामांच्या दर्जाबाबत भाजपने उपस्थित केलेल्या या आरोपांमुळे संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, चौकशीकडे आता लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande