
पुणे, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेचा प्राथमिक चौकशी अहवाल उच्चस्तरीय समितीने राज्य शासनाला सादर केला आहे. दुर्घटनेची कारणे, सुरक्षा नियमांचे पालन, प्रकल्पातील कार्यपद्धती आणि विविध यंत्रणांची प्राथमिक जबाबदारी याबाबत समितीने निरीक्षणे नोंदविल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळला होता. या दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले होते. दुर्घटनेची सखोल आणि तांत्रिक चौकशी करण्यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाने १३ जुलै रोजी पुण्याच्या विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती.
समितीने गेल्या महिनाभरात घटनास्थळाची पाहणी केली. महापालिका अधिकारी, कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी, तांत्रिक तज्ज्ञ आणि प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले. तसेच प्रकल्पाच्या मंजुरी, सुरक्षा परवानग्या, संरचनात्मक आराखडे आणि देखभाल नोंदींचीही तपासणी करण्यात आली. या तपासणीच्या आधारे १४ ऑगस्ट रोजी प्राथमिक अहवाल शासनाला सादर करण्यात आला.
प्रशासकीय इमारतीकडे संरचनात्मक स्थैर्याचे प्रमाणपत्र होते का, धोकादायक क्षेत्रात या इमारतीला परवानगी कशी देण्यात आली आणि महापालिका व कंत्राटदार यांच्यात देखरेखीची जबाबदारी नेमकी कोणाची होती, यासह विविध मुद्द्यांची समितीने छाननी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु