अमरावती - फिनले मिलसाठी ४१ कोटींचा निधी; केंद्राच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश
अमरावती, 20 ऑगस्ट, (हिं.स.)। अमरावती येथील बंद असलेली फिनले मिल पुन्हा सुरू करण्यासाठी ४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी दिले. मुंबईतील विधानभवनात झालेल्या समितीच्या आढावा बैठकी
फिनले मिलसाठी ४१ कोटींचा निधी केंद्राच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश


अमरावती, 20 ऑगस्ट, (हिं.स.)। अमरावती येथील बंद असलेली फिनले मिल पुन्हा सुरू करण्यासाठी ४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी दिले. मुंबईतील विधानभवनात झालेल्या समितीच्या आढावा बैठकीत फिनले मिलसह अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

फिनले मिल सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत आवश्यक प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री यांच्या मान्यतेनंतर केंद्र शासनाच्या परवानगीसाठी पाठविण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देशही संबंधित विभागाला देण्यात आले. सूतगिरणी कामगारांचे प्रलंबित व थकीत अनुदान देण्याबाबतही तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार प्रवीण तायडे यांच्या पाठपुराव्याला या निर्णयामुळे यश मिळाल्याचे सांगण्यात आले.

अचलपूर तालुक्यातील वासनी-बोर्डी नाला आणि राजुरा सिंचन प्रकल्पांच्या रखडलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन प्रत्यक्ष कामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. तिवसा तालुक्यातील शिवणगाव व बोर नदी प्रकल्पांतील ३९ शेतकऱ्यांना २ कोटी ५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याबाबतही कार्यवाही करण्यास सांगण्यात आले.

अमरावतीतील छत्री तलावाच्या सौंदर्यीकरणासह चौकीदाराची नियुक्ती, तसेच इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत नागरिकांना माहिती देणारा फलक लावण्याचे निर्देशही देण्यात आले.

याशिवाय पाणंद रस्त्यांतील गैरव्यवहार, औद्योगिक भूखंड विक्रीतील अनियमितता, शहराची पाणीपुरवठा योजना, रस्ते व विकासकामांतील तक्रारी, रुग्णालयांसाठी निधी आणि आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या भोजनाचा दर्जा आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. शासनाची आश्वासने केवळ कागदावर न राहता निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश आमदार रवी राणा यांनी अधिकाऱ्यांना दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande