पिंपरी-चिंचवडकरांनो, रस्त्यावर खड्डा दिसला?; ‘स्मार्ट सारथी’वर करा तक्रार
पुणे, 20 ऑगस्ट (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती महापालिकेपर्यंत तातडीने पोहोचवण्यासाठी ‘स्मार्ट सारथी पीसीएमसी’ ॲपमध्ये ‘खड्डे नोंदवा’ ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर खड्डा आ
PCMC


पुणे, 20 ऑगस्ट (हिं.स.)।

पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती महापालिकेपर्यंत तातडीने पोहोचवण्यासाठी ‘स्मार्ट सारथी पीसीएमसी’ ॲपमध्ये ‘खड्डे नोंदवा’ ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर खड्डा आढळल्यास थेट ॲपद्वारे त्याची तक्रार नोंदविता येणार आहे.

तक्रार नोंदविताना खड्ड्याचे छायाचित्र, जीपीएसद्वारे अचूक ठिकाण, पत्ता आणि खड्ड्याचा अंदाजे आकार याची माहिती द्यावी लागणार आहे. तक्रार नोंदवल्यानंतर नागरिकाला तक्रार क्रमांक मिळणार असून, त्याद्वारे तक्रारीची सद्यःस्थिती ऑनलाइन पाहता येणार आहे. खड्डा दुरुस्त झाल्यानंतर संबंधित तक्रार बंद करून त्याची माहिती नागरिकाला उपलब्ध करून दिली जाणार आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर आतापर्यंत २ हजार २४७ खड्डे आढळले आहेत. त्यापैकी १ हजार ७३३ खड्डे बुजविण्यात आले असून, ५१४ खड्डे अद्याप बुजविणे बाकी आहेत. आतापर्यंत ७७.१३ टक्के खड्डे बुजविण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

‘स्मार्ट सारथी पीसीएमसी’ ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे. ॲपमधील ‘पीसीएमसी सेवा’ या विभागात ‘खड्डे नोंदवा’ हा पर्याय निवडून नागरिक तक्रार नोंदवू शकतात.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांनी खड्डा दिसल्यास त्याचे छायाचित्र काढून ठिकाणाची माहिती नोंदवावी आणि ॲपद्वारे तक्रार करावी, असे आवाहन केले आहे. सुरक्षित रस्त्यांसाठी महापालिकेच्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande