जुन्नर - पिंपळवंडीतील कायदा-सुव्यवस्थेवर ग्रामस्थांचा संताप; पोलीस अधीक्षकांना घेराव
पुणे, 20 ऑगस्ट (हिं.स.)। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, तसेच नसरापूर येथील अत्याचाराच्या घटनेप्रमाणे या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी मागणी पिंपळवंडी ग्रामस्थ आणि पीडित मुलीच्या नात
grdf


पुणे, 20 ऑगस्ट (हिं.स.)।

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, तसेच नसरापूर येथील अत्याचाराच्या घटनेप्रमाणे या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी मागणी पिंपळवंडी ग्रामस्थ आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याकडे केली.

पिंपळवंडी येथील घटनेची माहिती घेण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी मंगळवारी रात्री ११ वाजता घटनास्थळी भेट दिली. यावेळी ग्रामस्थ आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांनी त्यांना घेराव घालत घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, तसेच खटला जलदगतीने चालविण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, नारायणगाव-आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळवंडी पोलीस आऊट पोस्टला मागील आठ ते दहा वर्षांपासून कुलूप असल्याचा मुद्दाही ग्रामस्थांनी उपस्थित केला. पिंपळवंडी हे मोठे गाव असून, परिसरात अवैध दारूविक्री सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. पोलीस आऊट पोस्ट बंद असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी ग्रामस्थांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या धर्तीवर या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक पद्धतीने करावी, अशी मागणी केली.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्यासह आळेफाटा, नारायणगाव, ओतूर आणि जुन्नर पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande