
पुणे, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
पुण्याचा प्रतिष्ठित गणेशोत्सव शहराची संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक मानला जातो. दरवर्षी या उत्सवाकडे देशभरातील नागरिकांचे लक्ष असते. यंदाच्या गणेशोत्सवाची तयारी सुरू असतानाच ध्वनिक्षेपकाच्या वापरावरील निर्बंधांवरून गणेश मंडळे आणि पोलीस प्रशासन आमनेसामने आले आहेत.
जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजक आणि गणेशभक्तांना निर्धारित ध्वनिक्षेपक नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असतानाच पुण्यातील गणेश मंडळांनी ध्वनिक्षेपकाच्या निर्बंधांवर आक्षेप घेत पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडून गणेशोत्सवातील साउंडवर निर्बंध लावले जात असल्याचा आरोप केला आहे. वर्षभर विविध सण आणि उत्सव होत असताना केवळ गणेशोत्सवाच्या काळातच नवीन नियमावली आणि निर्बंध का लावले जातात, असा सवाल मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निर्बंधांवर नाराजी व्यक्त करत, “आमच्यावर अनावश्यक निर्बंध लावू नका. कार्यकर्त्यांना काय करायचे आणि काय करू नये, याची जाणीव आहे. अधिकारी येतात आणि जातात; मात्र कार्यकर्ते वर्षानुवर्षे उत्सवाची जबाबदारी सांभाळतात,” अशी भूमिका मांडली. तसेच कार्यकर्त्यांना सिव्हिक सेन्स शिकवण्याची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, प्रत्येक गणेश मंडळाला ढोल-ताशा पथक उपलब्ध होणे शक्य नाही, असा मुद्दाही मंडळांकडून उपस्थित करण्यात आला. शहरात सर्वच मंडळांसाठी पुरेशा संख्येने ढोल-ताशा पथके उपलब्ध नसून, त्यांचे मानधन मोठ्या मंडळांना परवडते; मात्र लहान मंडळांना हा खर्च परवडत नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु